पुण्यातील अभियंत्याने तयार केला कोरोनाला दूर ठेवणारा एअर प्रेशर हेडबँड

पुणेः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तज्ञ् अनेक उपायांचा अवलंब करत आहेत. मास्क, सॅनिटायझर आदी गोष्टींचा अवलंब केला जात आहे. आता पुण्यातील अभियंता व डॉक्टर्सने मिळून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पॉझिटिव्ह एअर प्रेशर हेडबँडची निर्मिती केली आहे.

इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर सुनीत दोशी आणि सिंहगड डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ. समीर पाटील यांनी या अभिनव हेडबँडची निर्मिती केली आहे.

हवेच्या छोट्या सिलिंडरला किंवा वातावरणातील हवा फिल्टर करणाऱ्या कॉम्प्रेसरला जोडलेले हेडबँड कपाळावर घातल्यास तोंडाभोवती हवेचा पडदा (एअर कर्टन) तयार होणार आहे.

त्यामुळे श्वसनासाठी शुद्ध हवा उपलब्ध होईल, तसेच वातावरणातील किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या उच्छ्वासातून बाहेर पडणारे छोटे सूक्ष्मजंतू, विषाणू, प्रदूषित घटक शरीरात जाणार नाहीत, असा दावा या संशोधकांनी केला आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सध्या प्रत्येकालाच मास्क, फेसशील्ड वापरावे लागते. मात्र, खूप वेळ मास्क, फेसशील्ड घातल्यास चेहऱ्याला घाम येतो, जेवताना, पाणी पिताना मास्क, फेसशील्ड बाजूला काढून ठेवावे लागते.

वातावरणातील अनेक छोटे सूक्ष्मजंतू, विषाणू मास्कच्या बारीक छिद्रांतून शरीरात शिरण्याचा धोका असतो, तसेच शरीरातील सूक्ष्मजंतू उच्छ्वासाद्वारे बाहेर फेकण्यासही मास्कमुळे अटकाव होतो. त्यामुळे मास्क, फेसशील्डची उपयुक्तता मर्यादित ठरते.

त्याला पर्याय म्हणून या एअर प्रेशर हेडबँडची निर्मिती केल्याचे दोशी यांनी सांगितले. हा हेडबँड असेल करेल कार्य एक लिटर पाण्याच्या बाटलीएवढा हवेचा सिलिंडर किंवा तीन इंची एअर कॉम्प्रेसर या हेडबँडला   जोडलेला असेल.

एअर सिलिंडरमधील हवा किंवा कॉम्प्रेसरने शुद्ध केलेली हवा हेडबँडच्या छिद्रातून (स्प्लिटमधून) चेहऱ्याभोवती पडदा (एअर कर्टन) तयार करील.

एखाद्या मॉलच्या दरवाजाजवळ जसा हवेचा पडदा असतो, तसा हवेचा पडदा चेहऱ्याभोवती असेल. त्यामुळे शरीराला शुद्ध हवेचा पुरवठा होईल, तसेच बाह्य वातावरणातील सूक्ष्मजंतू, विषाणू, प्रदूषित घटकांना अटकाव होईल.

एखादा सूक्ष्मजंतू, विषाणू चेहऱ्याजवळ आला, तरी त्याला हवेच्या पडद्यामुळे तो खाली ढकलला जाईल. जवळपास असलेल्या व्यक्तीच्या उच्छ्वासातून बाहेर पडणारे विषाणूही या पडद्यामुळे रोखले जातील.