कांदा वधारला; चार हजाराच्या पार गेला

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- राज्यातील नवीन कांद्याची आवक वाढण्यास अद्याप पंधरा दिवसांचा अवधी आहे. त्याच दरम्यान महाराष्ट्रातही कांद्याची आवक आणखी वाढणार आहे. त्यापूर्वीच कांद्याच्या भाव वधारले आहे.

नुकतेच घोडेगाव, संगमनेर आणि राहात्यात बुधवारी कांद्याचे भाव 4 हजार रुपयांच्या पुढे पोहचले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक सुखावला असलातरी कांदा दरवाढीने महिलांचे बजेट बिघडू लागले आहे.

मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने उन्हाळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कर्नाटक आणि अन्य राज्यांतही पावसाचा फटका बसला. त्यामुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले होते.

याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आणि निर्यातबंदी केली तसेच अन्य देशांतून कांदा आणला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण होऊ लागली.

त्यानंतर साठवण मर्यादेवरची आणि निर्यातबंदी हटविली. उन्हाळ कांदा संपला असून नवीन कांद्यालाही मागणी वाढल्याने कांद्याच्या भावात वाढ झाल्याचे सांगण्यात येते.