पुन्हा तीन कावळ्यांचा मृत्यू; या गावात बर्ड फ्लूची भिती

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात काही ठिकाणी बर्ड फ्लूने अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरणे वाढू लागल्याने प्रशासनाने देखील हे प्रकरण गंभीर घेत उपाययोजना सुरु केल्या आहेत.

नुकतेच देवळाली प्रवरा येथील सोपान भांड यांच्या वस्तीवर 03 कावळे मृतावस्थेत आढळले. हे मृत्यू बर्डफ्लूने झाले, की अन्य कारणांमुळे याचा शोध सुरू आहे. तीनपैकी दोन कावळे कुत्र्यांच्या भक्ष्यस्थानी पडले.

ही माहिती समजताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत व उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधला. पशुधन विकास अधिकारी डाॅ. अमर प्रसाद माने यांनी पथकासह मृत कावळ्यांची पाहणी केली.

मृत्यू कशाने झाला, हे आत्ताच समजणार नाही, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, बर्डफ्लूची अफवा पसरल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

प्रयोगाशाळेचा अहवाल आल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुख्याधिकारी निकत व उपनगराध्यक्ष संसारे यांनी केले आहे.