मुंडे साहेब यांचा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- अमेरिकेच्या हॅकरने ईव्हीएमसाठी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांची हत्या झाल्याचा दावा केला. मुंडे साहेबांचा वारसा चालवणाऱ्या एकाही व्यक्तीने सत्तेला लाथ मारत या घातपाताच्या दाव्याची चौकशी करण्यास सांगितले नाही.

आम्ही मात्र हा अपघात आहे की घात हे सिद्ध झाल्याशिवाय शांत बसणार नाही असा घणाघात करत धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारसह पंकजा मुंडेना धारेवर धरले.

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नावाने ऊस मजूरांचे महामंडळ काढण्याचे सरकारने योजले होते, तेही त्यांनीच रद्द केले. औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी जागा देणार होते. कुठे आहे जागा? कुठे आहे स्मारक? नुसत्या हवेत गप्पा. हा मुंडे साहेबांचा अपमान असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांतील सर्वाधिक, हा दावा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्याल करतंय. मोदीजी तुमच्या नोटबंदीनं काय साध्य केलं? देशातील तरूणांना रोजगार देणं तर सोडाच, ज्यांच्याकडे रोजगार होता त्यांच्या पोटावरसुद्धा तुम्ही पाय दिला, अशी टीका त्यांनी केली.

सरकारने शेतकऱ्यांना तूर लावण्यास सांगूनही तूरीला भाव दिला नाही. मंत्री सुभाष देशमुख यांनी तूर डाळीत केलेला भ्रष्टाचार आम्ही उघड केला. त्याची साधी चौकशीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली नाही.

या घोटाळ्यामुळेच शेतकऱ्यांना तूरीसाठी योग्य भाव मिळाला नाही. तीन लाख रुपयांच्या कर्जबाजारीपणामुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्येतून नगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.

काही दिवसांपूर्वी नांदेड येथे शेतकऱ्याने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. पाषाण ह्रदयी सरकारला पाझर फुटत नसेल तर मग हे सरकार हवे कशाला? असा प्रश्न त्यांनी सभेत उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment