पाण्याअभावी वन क्षेत्रातील पशु, पक्षी मरत असताना वन विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- पाण्याअभावी वन क्षेत्रातील पशु, पक्षी मरत असताना याकडे दुर्लक्ष करणार्‍या वन विभागाच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने वन्यजीव तहान तडफड सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन केले जाणार आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून वन विभागाच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आणण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. मार्च पासूनच उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना वन क्षेत्रातील पशु, पक्षी पाण्यासाठी भटकत आहे.

संघटनेने आठ वर्षापुर्वी महाराष्ट्रात भिम हनुमान बंधारे बांधण्याची मागणी तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे केली होती. मात्र ही संकल्पना त्यांना रुचली नसल्याने भिम हनुमान बंधारे बांधण्यास परवानगी मिळाली नाही.

अनेक वर्षे मार्च ते जून डोंगराळ व वन विभागाच्या हद्दीत वन्य पशु, पक्षी तहान व अन्नापासून वंचित राहतात. यामध्ये अनेक पशु-पक्ष्यांचा जीव देखील जातो. मात्र हा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

जंगलातील पशु व प्राणी पाणी, अन्नाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची दहशत पसरलेली आहे. नुकतेच राज्याचे वनमंत्री एका नाजुक प्रकरणात अडकले असताना, वन विभागाचा टंगळमंगळ कारभार सुरु आहे.

राज्यकर्त्यांना वन्यजीवांची पर्वा नसल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. राज्य सरकारने भिम हनुमान बंधारे बांधल्यास वन्य पशु-पक्ष्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. तसेच जलयुक्त जंगल ही संकल्पना असतित्वात येणार आहे.

उन्हाच्या तीव्रतेने पशु, पक्षी पाण्याअभावी तडफडून मरत असताना वनविभाग याकडे फक्त बघ्याची भूमिका घेत असून, या विरोधात संघटनेने वन्यजीव तहान तडफड सत्यबोधी सुर्यनामा आंदोलन जारी केले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News