मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचलनाखाली सध्या सुरू असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ (केबीसी) सीझन ११ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनादर केल्याप्रकरणी शनिवारी बच्चन यांनी ट्विटरवर माफी मागितली.
केबीसीच्या ६ नोव्हेंबरच्या भागामध्ये शहेदा चंद्रन या स्पर्धकाला असा प्रश्न विचारण्यात आला की, यापैकी कोणते राज्यकर्ते मोगल सम्राट औरंगजेब यांच्या काळातील आहेत. पर्याय असे दिले होते महाराणा प्रताप, राणा सिंग, महाराजा रणजित सिंग आणि शिवाजी. म्हणजे या प्रश्नामध्ये छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला होता.
त्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली. शिवरायांना मानणाऱ्यांच्या भावना त्यामुळे दुखावल्या. हा वाद उफाळून येताच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच ७ नोव्हेंबर रोजी सोनी टीव्ही चॅनलने जाहीर माफी मागितली.
तरीही सोशल मीडियावर वाद सुरूच राहिला. अखेर सोनी टीव्हीवर केबीसी चालवणारे सिद्धार्थ बासू यांनी स्पष्टीकरण करत माफी मागितली. आता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी बासू यांचे हेच ट्विट रिट्विट केले असून, चुकीबद्दल माफी मागितली आहे.
‘कुणाचाही अवमान करण्याचा आमचा हेतू मुळीच नव्हता तरीही जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल माफी असावी’ असे बासू आणि बच्चन यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.