महापौरपदासाठी स्थानिक नेत्यांकडून पक्षपातळीवर गाठीभेटी सुरु

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- नगरच्या महापौरपदाची पहिली टर्म संपत आहे. येत्या 30 जूनला ही मुदत संपत आहे. नव्या निवडीसाठी महापालिकेने नाशिक विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होईल की नाही, हेही अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान यंदाचे महापौरपद हे अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी राखीव आहे. दरम्यान सध्या महापौरपद भाजपकडे असून त्यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा दिला आहे.

दुसऱ्या टर्ममध्ये शिवसेना व कॉंग्रेस नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या बाबत शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे पद आपल्यालाच मिळविण्याचा शब्द घेतला आहे. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनीही महसूलमंत्र्यांच्या माध्यमातून “फिल्डिंग’ लावली आहे.

नगर महापालिकेचे महापौरपद सध्या भाजपकडे आहे. यापूर्वी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला या पदावर संधी मिळाली. दरम्यान यंदाच्या वेळी काय होणार याची उत्सुकता लागली आहे. महापौरपदासाठी शिवसेनेकडे नगरसेविका रोहिणी शेंडगे, रिता भाकरे व शांताबाई शिंदे या उमेदवार आहेत.

नगरमध्ये कॉंग्रेसला संजीवनी देण्यासाठी हे पद कॉंग्रेसला मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहे. याबाबत स्थानिक नेत्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना गळ घातली आहे. कॉंग्रेसकडून नगरसेविका शीला चव्हाण या एकमेव उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीकडे नगरसेविका रूपाली पारगे या एकमेव उमेदवार आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे सगळी सूत्र आहेत. मागील वेळी राष्ट्रवादीच्या मदतीने भाजपला महापौरपद मिळाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. शिवसेना व कॉंग्रेसने महापौरपदासाठी दावा केला असला, तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe