साईबाबा संस्थान आणि शिर्डीच्या विकासाला खिळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा निषेध !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- माहिती अधिकार कायद्याचा दुरुपयोग करून साईबाबा संस्थान आणि शिर्डीच्या विकासाला खिळ घालणाऱ्या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या बैठकीत निषेध करण्यात आला.

साईबाबांच्या नावाचा वापर करून सुरू असलेल्या चुकीच्या कामांचा तातडीने बंदोबस्त करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना देण्यात आले.

बैठकीला माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, महेंद्र शेळके, हरिश्चंद्र ऊर्फ सचिन कोते, सुजीत गोंदकर, विजय जगताप, नितीन कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय कोते, निलेश कोते, किशोर गंगवाल, ताराचंद कोते, राजेंद्र कोते, संदीप पारख, अजित पारख, सचिन कोते, मंगेश त्रिभूवन आदी मान्यवरांसह शिर्डीतील विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत शिर्डी शहराचा विकास आणि साईबाबा संस्थानकडून अनेक प्रकल्प सुरू करण्यासंबधी निर्णय झालेले असताना फक्त माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या अडमुठेपणाच्या धोरणामुळे प्रकल्प सुरू होऊ शकलेले नाहीत.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी चांगल्या गोष्टींसाठी माहिती अधिकाराचा वापर करण्यास ग्रामस्थांचा विरोध नाही; मात्र व्यक्तिगत महत्वाकांक्षेपोटी या कायद्याचा दुरूपयोग करून संस्थानला वेठीस धरण्याच्या प्रवृत्तीमुळे शिर्डी शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे.

या कार्यकर्त्यांना आवर धालण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. कोरोनामुळे साईबाबा मंदिर बंद असल्याने शिर्डीच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम झालेला आहे.

सद्यस्थितीत कोरोनाची रूग्ण संख्या कमी झाल्याने शिर्डी अनलॉक केली आहे; मात्र मंदिर बंद असल्याने अनलॉकचा फायदा नाही. त्यामुळे मंदीर खुले करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.