अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेत लग्न लावणाऱ्या सरपंचासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल !

Ahmednagarlive24
Published:
अहमदनगर :-  नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे गावातील अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पळवून नेऊन तिचे गावातील तरुणाशी एका मंदिरात लग्न लावून देण्यात आले आहे. 
याप्रकरणी नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात गावातील सरंपचाने मदत केल्याने त्याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय पोपट चोभे, शिवराज अशोक इंगळे, अतुल रोहिदास चोभे, सरपंच दीपक भीमा साळवे यांना आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दत्तात्रय चोभे हा तरुण पीडित मुलीच्या घरी येत होता. ६ नोव्हेंबर रोजी चोभे याने मुलीला फोन करून गावातील मंदिराकडे बोलविले. परंतु मुलीने जाण्यास नकार दिला.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्तात्रय चोभे व शिवराज इंगळे या दोघांनी मुलीला मोटारसायकलवरून गावाजवळील डोंगरावर असलेल्या खंडोबा मंदिरात घेऊन गेले.
अतुल चोभे व गावातील सरपंच दीपक साळवे हे ही मोटारसायकलवरून मंदिरात आले. त्यावेळी अल्पवयीन मुलीचे दत्तात्रय चोभे याच्याबरोबर मंदिरात लग्न लावून देण्यात आले.
या सर्व प्रकाराचे फोटो, व्हिडिओ शुटिंग अतुल चोभे याने मोबाइलमध्ये काढले. लग्न झाल्यानंतर मुलीला मंदिरात सोडून देण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितले.
त्यानंतर बुधवारी आईने पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध तक्रार दिली. मुलीचा शारीरिक व लैंगिक छळ झाला नसल्याने वैद्यकीय तपासणी करायची नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment