संगमनेर :- संगमनेरचा विकास हा शेजारच्यांना पाहवत नाही. कुटनीतीचा वापर करून विकास कामांमध्ये आडकाठी निर्माण करणे व वाकड्यात शिरणे ही विखेंची परंपरा आहे, असे प्रत्युत्तर संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाषराव सांगळे यांनी दिले डॉ. सुजय विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आ. थोरातांवर केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.
संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या ‘चलो पंचायत अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. संगमनेर तालुका हा दुष्काळी आहे. परंतु आमदार थोरात यांच्या सक्षम नेतृत्वामुळे संगमनेरचा विकास इतरांना मार्गदर्शक ठरला आहे.
त्यांनी पाण्यासाठी कायम संघर्ष केला. या संघर्षातून संगमनेर- अकोलेकरिता 30 टक्के हक्काचे पाणी मिळाले. दुष्काळी भागासाठी निळवंडे धरण पूर्ण केले. त्यात विखे यांचे काहीही योगदान नाही. तेच आता श्रेयासाठी धडपड करत आहेत. साई संस्थानच्या निधीचे श्रेय घेणार्यांनी विसरू नये की, तो पैसा हा साईभक्तांचा आहे.
विखे परिवाराचा नाही. फक्त राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलणार्याची वाकड्यात शिरण्याची परंपरा जुनीच आहे. 40 वर्षे खासदारकी असतांना लोणीबाहेर एकही विकासकाम का नाही, हे आधी अभ्यासावे. राहत्याला पिण्यास पाणी लवकर मिळत नाही. लोणी जवळ गोगलगाव, केलवड येथील गावांना टँकरची परिस्थिती कोण पाहणार?
आधी राहाता तालुक्यातील जनतेला भयमुक्त करा. 2001 मध्ये केवळ आमदार थोरातांच्या पक्षनिष्ठा व सरळ स्वभावामुळे याच 28 गावांनी शिर्डीचे आमदार केले हे विसरु नका. बोलतांना भान ठेवा, अन्यथा ‘सौ शहरी, एक संगमनेरी’चा हिसका दाखवत जनताच वाकड्यात शिरेल, असा इशारा त्यांनी दिला.