अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नगर मनपा च्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आले असले तरी जिल्ह्यात मात्र पालकमंत्रिपदावरून दोघांत मतभेदाची चिन्हे दिसू लागली आहेत.
नेवासा तालुक्यात झालेल्या शिवसंवाद मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यांच्याऐवजी शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांना नगरचे पालकमंत्री करावे, अशी मागणी करण्यात आली.

नगर जिल्ह्यात १२ पैकी राष्ट्रवादीचे ६, भाजपचे ३, काँग्रेसचे २, शिवसेनेचा १ आमदार असे संख्याबळ आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद त्यावेळी राष्ट्रवादीकडे देण्यात आले होते. या पदावर कोल्हापूरचे मुश्रीफ यांची नियुक्ती झाल्यापासूनच विरोध सुरू झाला होता.
एवढ्या दूरचा पालकमंत्री नको, अशी भूमिका होती. त्यावेळी काँग्रेसचे मंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे नाराजीनाट्यही पाहायला मिळाले. सुरुवातीला मुश्रीफ स्वत:ही तयार नव्हते.
मात्र, त्यांनी जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवात केली. कोल्हापूरमध्ये जास्त काळ कार्यरत असल्याने त्यांना नगरकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही, यावरूनही जिल्ह्यातून तक्रारीचा सूर आहे.
कृषिमंत्री दादा भुसे, जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नेवासा तालुक्यात सोनई येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ‘शिवसंवाद’ मेळावा झाला.
त्यामध्ये मंत्री गडाख यांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री करा, अशी मागणी पुढे करण्यात आली. यावर बोलताना मंत्री भुसे म्हणाले, ‘काही गोष्टी अशा असतात की त्या येथे बोलता येणार नाहीत. त्यासाठी आम्हाला मंत्रालय पातळीवर बोलावे लागणार आहे.
यातील काही गोष्टी तर मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घालाव्या लागणार आहेत. सध्याच्या पालकमंत्र्यांनीही लक्षात घ्यावे की महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. असे ते म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम