अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- सक्कर चौक ते सरोज टॉकिजपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे काम सुरु असून, या कामामध्ये नियोजन नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली असून, त्यामुळे छोट-मोठे अपघात होत असून, त्याचबरोबर ट्रॅफिकही जाम होत आहे.
याकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व उप महाप्रबंधक प्रकल्प संचालक पी.बी.दिवाण यांना निवेदन देऊन रस्त्यांची कामे तातडीने व्हावीत, अन्यथा अर्धनग्न आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राधाकिसन कुलट, तालुकाध्यक्ष दत्तात्रय शेडाळे, शहर जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे आदि उपस्थित होते. प्रकल्प संचालक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे
की, सक्कर चौक ते सरोज टॉकीजपर्यंतच्या उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ते, त्याचबरोबर पिण्याच्या पाईपलाईन, ड्रेनेज लाईन आदिंसह इतरही लाईन तोडण्यात आल्या आहेत.
त्यामुळे अनेक भागात पिण्याचा पाण्याचा, ड्रेनेज, टेलीफोन, इंटरनेट सेवा आदिं समस्या निर्माण झाल्या आहेत. या रस्त्याच्या कामांबाबतची पूर्ण जबाबदारी आपल्या कार्यालयावर असून, संबंधित एजन्सीने वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे या मार्गावर खड्डेच खड्डे झाले आहेत.
त्यामुळे नागरिकांना जाता येता मोठा त्रास होत असून, छोट-मोठ्या अपघाताबरोबरच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तरी आपण याबाबत लक्ष घालून त्वरित या रस्त्याची कामे व्हावीत, अन्यथा पुढील काळात आपल्या कार्यालयात अर्धनग्न आंदोलन केले जाईल,
असा इशाराही या निवेदनात दिला आहे. याप्रसंगी अक्षय कांबळे म्हणाले, गेल्या अनेक अनेक महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरु आहेत. विविध प्रकारच्या लाईन शिफ्टींगचे काम मनपाचे असून, निधी अभावी ते रखडले असल्याचे समजते.
याबाबत अधिकार्यांना विचारणा केल्यास प्रत्येक विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपले कर्तव्य टाळत आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. ही कामे तातडीने करण्यात बाबत निवेदनत देण्यात आले आहे.
अन्यथा शिव राष्ट्र सेनेच्यावतीने राष्ट्रीय प्राधिकरण कार्यालयात अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रकल्प संचालक पी.बी.दिवाण यांनीही निवेदनाची दखल घेऊन आपल्या मागण्याबाबत जरुर विचार करुन तातडीने प्रलंबित कामे केली जातील, याबाबत संबंधितांना सूचना देऊ, असे आश्वासन दिले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम