अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे;मात्र तिसऱ्या लाटेचा धोका वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप राज्यातील धार्मिक स्थळे बंदच आहेत. मंदिर बंदमुळे अनेक व्यवसाय ठप्प झालेले आहेत.
तरी जोपर्यंत साई मंदिर दर्शनासाठी खुले होत नाही तोपर्यंत शिर्डी शहरातील सक्तीने केली जाणारी वीजबिल वसुली आणि वीजजोड तोडण्याची कारवाई त्वरित थांबवा.
अशी मागणी भाजपच्यावतीने शिर्डी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दुर्गेश जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरातील अर्थव्यवस्था अडचणीत आलेली आहे.
गेल्या वर्ष दीड वर्षापासून या ठिकाणी असलेला उद्योग व्यवसाय हा कोरोनामुळे पूर्णपणे ठप्प झालेला आहे. त्यामुळे कधी नव्हे ती या ठिकाणी थकबाकी वाढलेली दिसते. या थकबाकीची वसुली अत्यंत कडक पद्धतीने चालू आहे.
काही ठिकाणी वीजजोड तोडले जात आहे. व्यापारी व घरगुती ग्राहकांची वीज वितरण कंपनीला बिल देण्याची मानसिकता आहे; परंतु त्यासाठी त्यांना थोडा वेळ देण्याची आणि कंपनीने संयम ठेवण्याची आवश्यकता आहे.
त्यामुळे साई मंदिर खुले होईपर्यंत सक्तीने केली जाणारी वीज बिल वसुली आणि वीजजोड तोडण्याची कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम