अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- कोपरगाव बसस्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एका तरुणाचे कारमधून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.
या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पुणे जिल्ह्यातून पाच आरोपींना नुकतीच अटक केली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश असून ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्रमिला पवार नामक महिलेच्या सांगण्यावरून ५ लाख रुपयांच्या मागणीसाठी मनमाडच्या स्वामी जनार्दन नगर येथील सचिन वसंत जाधव (वय ३५) या तरुणाचे कोपरगाव शहरातील बसस्थानक येथून १५ जुलै रोजी दुपारी पांढऱ्या रंगाच्या इर्टीगा कारमधून आलेल्या अज्ञात तिघे इसम व एक महिला अज्ञात यांनी अपहरण केले होते.
याबाबत अपहृत तरुणाची पत्नी भावना जाधव यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत होते.
शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक गोष्टींच्या आधारे पुणे जिल्ह्यातील आळेफाटा येथील एका घरात डांबून ठेवलेल्या अपहृत तरुणाची सुटका करत एकनाथ हरिभाऊ हाडवळे (वय ५४, रा.राजुरी, ता.जुन्नर),
भाऊसाहेब विठ्ठल काळे (वय ४०, रा.आळेफाटा, ता.जुन्नर), प्रवीण रबाजी खेमनर (वय २८, रा.अंभोरे, ता.संगमनेर), प्रमिला महेश पवार (वय ३५, रा.चेहेडी, ता.जि. नाशिक) व सीमा भाऊसाहेब काळे (वय ३५, रा.आळेफाटा, ता.जुन्नर)
यांना ताब्यात घेऊन ६ लाख रुपयांची इर्टीगा कार (क्र. एमएच.१४, जेए.६५७२) आणि गुन्ह्यात वापरलेले दहा हजार रुपयांचे दोन मोबाईल असा ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक बी.सी.नागरे, पो.कॉ.जी.पी.थोरात, पी.बी.बनकर, महिला पोलीस विजया दिवे, पो.ना.फुरकान शेख,
गृहरक्षक दलाचे जवान दीपक गर्जे आदिंनी केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नागरे, थोरात, बनकर व एम.ए.काटे हे करत आहे. या धाडसी कारवाईचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम