अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात खरिपाच्या सरासरीएवढी पेरणी होत आली असली तरी गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातही यंदा अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे.
अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असल्याने भंडारदरा, निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळातही पाणी येण्याची आशा वाढली आहे. दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.भंडारदरा धरणातून ८३७ क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुळा नदीही कोतूळजवळ ३ हजार २१२ क्युसेकने पाणी वाहत आहे. इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू झाला आहे. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणात सर्वाधिक पाणीसाठा होत असतो.
यंदा मात्र जून महिना पावसाशिवाय गेला आहे. तर जुलैमध्ये काहीश्या पावसाळा सुरुवात झाली आहे. तर आता ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणाचे भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यात पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे.
मंगळवारपासून कमी प्रमाणात का होईना सुरू झालेला पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. मात्र पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम