उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 जुलै 2021 :- दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यावर राहुरी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दंडात्मक कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राहुरीतील व्यावसायिकांना शासनाच्या नियमाचे बंधन घालून सकाळी ८ ते दुपारी ४ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

मात्र सायंकाळी ६ वाजेनंतर ही काही व्यवसाय सुरू राहत असल्याने अशा मुजोर व्यावसायिकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, वाहतुक पोलिस अहिरे, चालक मोराळे यांनी नगर-मनमाड राज्य महामार्गावर तसेच शहरातील नवी पेठेत गस्त घालून उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली.

निर्बंध शिथिल करण्यात आल्याने छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. छोटे व्यावसायिक दिलेल्या वेळेचे बंधन पाळत आहेत. मात्र बडे व्यावसायिक नियम पायदळी तुडवून उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवतात. त्यामुळे महसूल विभाग, पोलिस व नगर परिषद प्रशासनाकडून संयुक्तपणे लक्ष ठेवण्याची गरज असताना महसूल व नगर परिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

ही जबाबदारी एकट्या पोलिस प्रशासनावर येऊन पडली आहे. कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने गेल्या दीड महिन्यापासून निर्बंध शिथिल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिकावर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेचे बंधन घातले आहे. सर्वांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe