पिचड यांची नेमकी आमदारकी गेल्यावरच त्यांना हे का सुचले?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडून जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अमृतवाहीनी नदीवरील भंडारदरा धरणास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण” असा नामकरणाचा कार्यक्रम सोमवारी (९ ऑगस्ट) आयोजित केला असल्याबद्दल आम्हास मनापासून आनंद होतो.

त्यास आमचा सक्रीय जाहीर पाठिंबा आहे. कारण अनेक वर्षांपासून आम्ही ही मागणी करीत आहोत. जेव्हा पिचड हे राज्यात सत्तेवर मंत्री होते, तेव्हापासून आजतागायत आमच्या या मागणीकडे लक्ष दिले नाही. आम्हालाच काय परंतु संपूर्ण आदिवासी समाजाला ही खंत लागून होती.

कारण आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे आमचा बाप आहे. ते आमचे भांगरे घराण्याचे नव्हे, तर संपूर्ण आदिवासींचे आदर्श, प्रेरणास्रोत व दैवत आहे. पण हे नामकरण करण्याचा प्रयत्न म्हणजेच पिचड पिता-पुत्रांचे आदिवासींबद्दल उफाळून आलेले पुतना मावशीचे प्रेम आहे,

असा उपरोधिक टोला आदिवासींचे लोकनेते अशोकराव भांगरे यांनी पिचड पिता-पुत्रास लगावला. धरण नामकरण संदर्भात अशोकराव भांगरे हे शनिवारी भंडारदऱ्यात पत्रकारांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भांंगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, शेंडी गावचे सरपंच दिलीप भांगरे, विठ्ठल खाडे, आनंदराव खाडे, धीरेंद्र सगभोर, शरद कोंडार उपस्थित होते.

माजी आमदार वैभव पिचड यांनी राघोजी भांगरे यांचे नाव देण्यााचे प्रथम प्राधान्य अकोले बसस्थानकास व नंतर म्हैसवळण घाटास दिले नसते. पण त्यांना भंडारदऱ्याचे नामकरण हे उशिरा सूचलेले शहाणपण आहे. मात्र, असे असले तरी देखील भंडारदरा धरणास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे धरण असे नाव देण्यास आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.

गेल्या ४० वर्षांत हेच पिचड राज्यात आदिवासी विकास व इतर अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचे मंत्री असताना त्यांना हे नामकरण करणे शक्य असूनही त्यांनी ते का केले नाही. शिवाय हे पिचड पिता-पुत्र अकोले तालुक्यात सलग ४० वर्षे आमदार असतानाही का केले नाही.

नेमके यांची आमदारकी गेल्यावरच यांना हे का सुचले? तेव्हा हे मंत्रिमंडळात असतानाच सरकारी गॅझेट्समधून अधिकृत नामकरण करण्यास कोणाचा विरोध होता. तेव्हा कसली अडचण होती काय? असे सवाल आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे यांच्या धरण नामकरणावर पिचड पितापुत्रांसमोर आदिवासींचे नेते अशोकराव भांगरे यांनी उपस्थित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe