सलाम त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला…! रविवारी देखील पोस्टखात्याने राख्या पोहच केल्या

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- दरवर्षी रक्षाबंधन हा सण संपूर्ण देशामध्ये उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी रक्षाबंधन सण नेमका रविवारी आला. त्यामुळे बहिणीने पाठवलेल्या राख्या भावापर्यंत वेळेवर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी पोस्ट खात्यावर आली.

शनिवार पर्यंत पोस्ट ऑफिस मध्ये आलेल्या सर्व राख्या पोचवण्यात आल्या होत्या. परंतु रविवारी साप्ताहिक सुट्टी असून देखील पोस्टखात्याने रविवारी देखील आलेल्या सर्व राख्या पोचवण्याची जबाबदारी पार पाडली. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोस्टमन हे रविवारी कर्तव्यावर होते.

पोस्ट ऑफिस मध्ये आलेले सर्व राखी टपाल त्यांनी वितरीत केले. जेणेकरून बहिणीने पाठविलेली राखी भावापर्यंत सणादिवशी मिळेल. जर रविवारी या राख्या वितरित केल्या नसत्या तर त्या राख्या सोमवारी द्याव्या लागल्या असत्या. परंतु रक्षाबंधनाचे महत्त्व निघून गेले असते, ही भावनिक बाब लक्षात घेऊन रक्षाबंधन सणा दिवशीच सर्व राख्या पोहोचवण्याची जबाबदारी पोस्ट खात्याने पार पाडली.

एसटी महामंडळाने देखील टपाल बॅगांची वाहतूक रविवारी देखील केली, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये टपाल पोहोचवता आले. याबद्दल पोस्ट खात्याच्या पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती मधुमिता दास व अहमदनगर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. राम कृष्णा यांनी सर्व पोस्टमन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

काही लोक शनिवार पर्यंत राखीची वाट पाहत होते. परंतु शनिवारी पर्यंत राखी न मिळाल्याने ते निराश झाले होते व त्यांच्या बहिणीने पाठवलेली राखी या वर्षी सणादिवशी मिळनार नाही असे त्यांना वाटत होते,

परंतु अचानक रविवारी पोस्टमनने आपल्या घरी येऊन ज्यावेळी राखी दिली त्यावेळी त्यांना सुखद धक्का बसला. त्यांनी पोस्ट खात्याचे व पर्यायाने पोस्ट मनचे आभार मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!