एकतर आमची तालुक्याबाहेर बदली करा किंवा देवरे यांची तरी…? पारनेर तहसील कार्यालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यांनी केली मागणी

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- असे म्हणतात की,’ घर फिरले की घराबरोबरच घराचे वासेही फिरतात’ अशी अवस्था आता पारनेरच्या ज्योती देवरे यांच्या बाबतीत घडत आहे. आ. निलेश लंके यांच्याविरोधात तक्रार केल्या नंतर तहसिलदार देवरे यांच्या विरोधातील चौकशी अहवाल उजेडात आल्याने अडचणीत सापडलेल्या देवरे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

तहसिल कार्यालयातील तब्बल ४१ कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्यासह सर्व सबंधितांना निवेदन पाठवून एक तर आमची तालुक्याबाहेर बदली करा किंवा देवरे यांची तरी पारनेरहून बदली करा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

मागणीचा विचार न झाल्यास २५ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. देवरे या पारनेर येथे रूजू झाल्यानंतर त्यांच्यात तसेच कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू झाला होता. त्याविरोधात कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच आमदार लंके यांनी कोरोेना स्थितीमुळे प्रशासनावर ताण आहे.

कर्मचाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही देवरे यांचा त्रास सुरूच राहिल्याने कर्मचाऱ्यांमधील संताप पुन्हा उफाळून आला आहे. देवरे या राजकियदृष्टया सक्रिय असल्यासारख्या वागतात. त्यामुळे खालच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या बऱ्यावाईट परिणामांना तोंड द्यावे लागते.

देवरे या कर्मचायांना वेळोवेळी धमक्याही देतात. त्यामुळे सर्व ४१ कर्मचारी पारनेर तालुक्यात काम करण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत. या गोष्टीचा विचार करून एकतर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची तालुक्यातून बदली करावी किंवा तहसिलदार ज्योेती देवरे यांची पारनेर येथून बदली करावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

कर्मचायांच्या मागणीचा विचार न झाल्यास दि. २५ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe