पुढच्या जन्मापर्यंत आ.लंके यांना पुण्य पुरेल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- चांगल्या ठिकाणी केलेलं काम कधीही दुप्पट होते. गायीला पाजलेलं पाणी, पाहुण्याला दिलेला चहा व वारकऱ्याची सेवा वाया जात नाही. याच पुण्यावर माणूस तरतो. आज हॉस्पिटल विकत घेणारी माणसं होती. महिनाभर डॉक्टर ठेवणारी लोकं होती. रूग्णाच्या वजनाइतके पैसे देणारे लोकं होती.

पण ते रूग्ण वाचले नाहीत. मित्र, पाहूणे, संपत्ती, एैश्‍वर्य कामाला येत नाही. मात्र चांगले कर्म वाया जात नाही. पुण्याला थोडा उशिर आहे, पण फळ निश्‍चित आहे. आमदार लंके यांनी चार महिन्यांपासून सुरू ठेवलेल्या या आरोग्य मंदीराचे पुण्य त्यांच्या पुढच्या जन्मापर्यंत पुरेल.

असे मत किर्तनकार निवृत्तीमहाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोविडसेंटरमध्ये आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,देव हा विशिष्ठ लोकांकडून विशिष्ठ काम करू घेतो. जी दगडं घाव सहन करतात तीच देवाच्या मुर्तीसाठी वापरली जातात.

पारनेर तालुक्यात सर्वात जास्त घाव सहन करणारा जो दगड आहे तो म्हणजे आ. नीलेश लंके ! ज्या झाडाला जास्त फळं ती झाडं वाकतात, तीच जास्त दिवस टिकतात. आ. लंके यांचं झाड वाकलेलं आहे त्यामुळे राजकरणात ते २५ वर्षे टिकणार आहेत.

या आरोग्य मंदीरातून एक माणूस बरा होउन गेला तर त्याच्या मुखातून पडणारा शब्द काशीच्या अमृतापेक्षाही मोठा आहे. गरीबांची सेवा केल्यावर माणूस देव होत नाही, देवपण मात्र आल्याशिवाय राहत नाही.

हजारो रूग्णांना कोरोनाचे उपचार देणारे नीलेश लंके हे त्यांच्यासाठी आमदार नाहीत तर त्यांच्यासाठी देव आहेत, हे कधीही लक्षात ठेवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe