पदाधिकारी निवडीवरून शिवसेनेंत दोन गटांत राडा !

Ahmednagarlive24
Published:

अकोले :- आमदार नरेंद्र दराडे व सुरेखा गव्हाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित संपर्क अभियान कार्यक्रमात शिवसेनेंतर्गत दोन गटांत पदाधिकारी निवडीवरून शुक्रवारी मोठा राडा झाला.

शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या घटनेच्या वेळी सुमारे पाचशे कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार दराडे यांचा सत्कार तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केल्यानंतर सुरेखा गव्हाणे यांच्या सत्काराला सभापती रंजना मेंगाळ यांच्याऐवजी माजी जि. प. सदस्य अनिता मोरे-धुमाळ यांना संधी दिली,

म्हणून धुमाळविरोधी कार्यकर्त्यांनी विरोध केला. कार्यकर्ते एकमेकांवर चालून गेले. काहीजण शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. शांतता प्रस्थापित झाल्यावर बैठक झाली.

मात्र, या धुमाळ गट तेथून निघून गेला. बैठकीनंतर दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर चिखलफेक केली.

राष्ट्रवादीचे माजी व आजी आमदार पिचड यांच्याशी हातमिळवणी करून यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाखो रुपये घेऊन पिचड यांच्या मर्जीतील उमेदवार उभे करून शिवसेना उमेदवारास पराभूत केल्याचा आरोप सेनेचे पराभूत उमेदवार मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, बाजीराव दराडे, ‘अगस्ती’तील सेनेचे संचालक महेश नवले, माधव तिटमे, कैलास शेळके, डाॅ. विजय पोपेरे, रूंभोडीचे सरपंच बाळासाहेब मालुंजकर आदींनी केला.

सेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा उपप्रमुख रामहरी तिकांडे, तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांच्यासह वादग्रस्त पदाधिकाऱ्यांना १५ दिवसांत पायउतार केले नाही, तर पंचायत समितीच्या सभापती रंजना मेंगाळ व उपसभापती मारुती मेंगाळ यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आपल्या पदांचे राजीनामे देतील, असा अल्टीमेटम देत थेट मातोश्रीवर धाव घेण्यात आली.

सेनेकडून उमेदवारी मिळावी, यासाठी साडेचार वर्षांत जनतेला तोंड न दाखवलेले तळपाडे आणि राष्ट्रवादीचे माजी मंत्री मधुकर पिचड व आमदार वैभव पिचड यांच्याशी हातमिळवणी व लाळघोटेपणा करून राष्ट्रवादीचे हस्तक म्हणून शिवसेनेत दाखल झालेले बाजीराव दराडे, शिवसेनेला अंधारात ठेवून राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन पिचडांच्या माध्यमातून पंचायत समिती चालवणाऱ्या सभापती रंजना मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ यांच्यासह सातत्याने शिवसेनेशी बेईमानी करण्यात आघाडीवर असलेल्या शिवसेनाविरोधी गद्दारांची टोळी कार्यरत असल्याचा आरोप सेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment