अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :- नगर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी वाहतूक संघटना आणि व्यापारी यांच्यात वाराई मुद्यावरून मतभेद झाले होते. त्यामुळे जोपर्यंत वाहतूक संघटना आणि व्यापारी यांच्यातील मतभेद मिटत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा लिलावासाठी आणू नयेत, असे पत्रक बाजार समितीने प्रसिद्ध केले होते.
पण माजी आमदार कर्डीले यांनी वाहतूक संघटना आणि व्यापारी यांच्यात समेट घडवून आल्यानंतर शनिवारपासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होतील, असे बाजार समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. गुरुवार दि. २ सप्टेंबर रोजी वाहतूक संघटना आणि खरेदीदार व्यापारी यांच्यात वाराई रक्कम कोणी द्यायची यावरून मतभेद झाले होते.
त्यामुळे कांदा वाहतूक न करण्याचा निर्णय वाहतूक संघटनेने घेतल्याने व्यापाऱ्यांनी लिलाव केले नाहीत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. बाजार समिती पदाधिकारी यांनी तात्पुरती मध्यस्थी करत गुरुवारी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे लिलाव पार पाडून घेतले.
जोपर्यंत वाहतूक संघटना आणि व्यापारी यांच्यातील मतभेद मिटत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणू नये असे जाहीर केले होते. दि. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य पातळी मिटींगमध्ये वाराईबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे ८ सप्टेंबर रोजी पुन्हा नगरमध्ये मिटींग घेवून पुढील निर्णय घेण्यात येईल.
तोपर्यंत जुन्या प्रचलित पध्दतीने काम सुरु ठेवावे, असे शिवाजीराव कर्डिले यांच्या मध्यस्थीने ठरले. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवानी शनिवार दि. ४ सप्टेंबर रोजी कांदा लिलाव पुर्ववत सुरु राहणार असल्याचे बाजार समितीने जाहीर केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम