मोबाईलवरुन तलाक..तलाक..तलाक.. मेसेज करत विवाहितेला घराबाहेर काढले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  माहेरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ करुन एका विवाहितेच्या पतीने मोबाईलवरुन तलाक..तलाक..तलाक.. असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक देत विवाहितेला घरातून बाहेर काढून दिले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पती,

सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित विवाहितेच्या पतीला एका बँकेत परमनंट नोकरीसाठी सासरच्या लोकांनी लग्नाच्या वेळीच 15 लाखांची मागणी केली.

विवाहितेच्या वडिलांनी लग्नावेळी 3 लाख व नंतर 2 लाख असे पाच लाख रुपये विवाहितेच्या पतीला दिले. त्यानंतरही आणखी दहा लाखांची माणगी करत सासरच्या लोकांकडून विवाहितेचा छळ करण्यात आला. भरोसा सेलमध्ये तक्रार झाल्यानंतर सामोपचाराने वाद मिटविण्यातही आला होता.

मात्र, त्यानंतर पुन्हा विवाहितेचा छळ सुरूच राहिला. एकेदिवशी विवाहितेच्या पतीने तिला मोबाईलवर ‘तलाक’चा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक दिला.

त्यानंतर घरातून बाहेर काढले. त्यामुळे विवाहितेने भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिली आहे. संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पती, सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe