अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची मोठी दुरावस्था निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यां निर्माण होत आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमधून संतापाची लाट निर्माण होत आहे. नुकतेच अशीच काहीशी परिस्थिती राहुरी तालुक्यातील करजगाव येथे निर्माण झाली आहे.
करजगाव येथील रस्ता मुत्युचा सापळा बनला असून रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांनी या रस्त्यावर वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. राहुरी तालुक्यातील करजगाव येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल ने-आण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.
कित्येक दिवसांपासून मागणी करूनही रस्ता दुरुस्त झाला नाही. पावसाने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरून पायी चालणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती कामे खोळंबली आहेत. सरपंच शनिफ पठाण यांनी आ. लहु कानडे यांच्याकडून निधी मंजूर करून घेतला.
ग्रामपंचायत कार्यालयातून रस्ता मंजूर आहे परंतु ठेकेदार तयार होत नसल्याचे सांगितले जाते. सदर रस्त्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी करजगाव येथील नागरिक व शेतकऱ्यांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम