अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कांबी परिसरात शनिवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे गावातील नदीला महापूर आला असून, या पुराचे पाणी गावात घुसल्याने अनेक नागरिक व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतही पुराच्या पाण्याचा शिरकाव झाल्याने उसासह अनेक पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. गावासह नजीकच्या अनेक वस्त्यांना पुराच्या पाण्याचा वेढा बसल्याने या वस्त्यांचा संपर्क अडचणीत सापडला आहे.
नदीकाठच्या अनेक कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या परिसरात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कांबी नदीला महापूर आला. या महापुराचे पाणी आठशे फुटापर्यंत गावात शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते. नदीकाठच्या म्हस्के, गाडे, कर्डिले, या वस्त्यांना पुराच्या पाण्यने वेढा दिला होता.
महापुराचे पाणी व्यावसायिकांच्या दुकानात घुसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, खरिपासह ऊस पीकदेखील वाहून गेल्याने बळिराजा हतबल झाला आहे.
नदीला पूर येऊन गावातील हनुमान मंदिर, हॉटेल, कृषी सेवा केंद्र, सिमेंट दुकान तसेच चप्पल दुकान, अशा अनेक व्यावसायिकांच्या दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
गावासह काही वस्त्यांना पाण्याचा वेढा पडल्याने नदीकाठचे २५ कुटुंबे, तर म्हस्के वस्तीवरील काही लोकांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करण्यात आले. या पुराने मुकी जनावरे, शेतजमिनी, तसेच खरिपातील सर्वच पिके वाहून गेली असून, उसाचे पीक आडवे झाले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम