अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नगर शहरात पोलिसांना मॅनेज करून किंवा त्यांच्यावर दबाव आणून खोटे गुन्हे दाखल करण्याची मालिका सुरु झाल्याची तक्रार शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केलीय.
मध्यंतरी काँग्रेस शहराध्यक्ष किरण काळे यांच्यावर आय टी पार्क प्रकरणावरून विनय भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा आधार घेत शिवसेना-भाजपाचे नेते जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील याना भेटण्यासाठी गेले होते. आमदार अनिल भैय्या राठोड हे जसे सामन्यांच्या मदतीला धावून जात होते .
सामन्यावर जर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अत्याचार केला तर स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून पोलीसांना जाब विचारत होते त्या प्रमाणे आता शिवसेना नेते काम करेल ज्यांच्यावर अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी शिवालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
नगर शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय दबावाचा वापर करतात व निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल करतात. मध्यंतरी अशाच प्रकारे काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर देखील आय टी पार्क पाहणी करण्यासाठी ते गेले असता त्यांच्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात तक्रारदार महिलेचा बोलावता धनी कोण आहे हे सर्वाना ठाऊक आहे. एम आय डी सी पोलिसांनी कोणाच्या दबावाला बळी पडून हा खोटा गुन्हा किरण काळे यांच्यावर दाखल केला हे सर्वाना माहित आहे . पोलिसांनी अशा दबावाला किंवा अमिषाला बळी पडून निष्पाप लोकांवर अन्याय करू नये,
बेकायदेशीरपणे वागू नये हे सांगण्यासाठी शिवसेना , भाजपा शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. तेथे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर,
माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भाजपचे माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक मदन आढाव, नगरसेवक योगीराज गाडे, माजी विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, नगरसेवक संग्राम शेळके, गौरव ढोणे, सागर गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी,
नगरसेवक या वेळी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. नगर शहरामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने वारंवार विविध शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.
मागील अनेक वर्षांपासून अशा प्रकारे पोलिस यंत्रणेवर दबाव आणत हे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांनी कोणतीही फिर्याद आधी लेखी तक्रार द्यायला हवी होती. त्याची शहानिशा करून पडताळणी करून मगच त्या आधारे पुढील कारवाई करायला हवी होती.
मात्र शहराच्या आमदारांनी पोलिसांवर दबाव आणला. त्या ठिकाणी आमदारांचे बगलबच्चे हे पोलिस स्टेशनला ठाण मांडून होते. जर घटना आयटी पार्क मधील होती तर आमदारांचे बगलबच्चे त्याठिकाणी दबाव आणण्याचे काम का करत होते, असा सवाल यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने उपस्थित केला.
शिवसेनेचे दिवंगत नेते अनिलभैया राठोड यांनी ज्या-ज्यावेळी या शहरात कुणावरही अन्याय झाला त्या-त्या वेळी अन्यायाच्या विरोधात परखड भूमिका घेण्याचे काम सातत्याने केले. त्याच भूमिकेतून शिवसेना उभी राहिल. प्रत्येक खोट्या गुन्ह्यात स्थानीक आमदाराचा हस्तक्षेप असतो.
त्याच्या निर्देशानुसार पोलीस बेकायदेशीर पणे कसे वागू शकतात. शिवसेना हे कदापि खपवून घेणार नाही . यापुढील काळात आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या पावलावर पाऊल ठेऊन अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप झालेल्या प्रत्येक बेकायदेशीर दाखल खोट्या गुन्ह्याची दखल शिवसेना घेईल आणि अन्यायाला वाचा फोडणार आहे.
इथून पुढे ज्यांच्यावर असा प्रकार घडेल त्यांनी शिवसेनेशी संपर्क साधावा शिवालय द्वार त्यांच्यासाठी उघडे आहे असे विक्रम राठोड यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम