अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. यावर न्यायालय मंगळवारी (७ सप्टेंबर) आपला निर्णय देणार आहे. या खटल्यातील सरकारी वकिल अॅड. उमेशचंद्र यादव यांनी गेल्या आठवड्यातच युक्तिवाद केला होता. तर बोठेचे वकिल अॅड. महेश तवले यांनी देखील युक्तिवाद केला.
जरे हत्याकांड प्रकरणी बोठे अटकेत असून आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल झालेले आहे. या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी बोठेतर्फे जिल्हा न्यायालयात गेल्या महिन्यात अर्ज करण्यात आला आहे. यामध्ये सरकारी वकील यादव यांनी पूर्वीच युक्तिवाद केला आहे.
बोठेचे वकील अॅड. महेश तवले यांनी बाजू मांडताना न्यायालयात सांगितले की, बोठेचा जरे यांना मारण्याचा उद्देश नव्हता. पोलिसांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून बोठे याला आरोपी घोषित केले आहे. या खटल्यात पोलिसांनी खूपच घाई केल्याचे दिसून येते.
तसेच याप्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे याचे नाव बोठेने हनीट्रॅपसंबंधी चालविलेल्या वृत्तमालिकेत होते. असे असताना बोठे भिंगारदिवेला सुपारी का देईल, असा प्रश्नही वकिलांनी उपस्थित केला. बोठेचा जरे यांना मारण्याचा उद्देश नसल्याचे तवले यांनी न्यायालयात सांगितले.
यापूर्वी युक्तिवाद करताना सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी बोठेला जामीन देण्यास सरकार पक्षातर्फे विरोध केला. ‘आरोपीने केलेला गुन्हा गंभीर असून, पोलिसांनी यासंबंधीचे बरेच पुरावे न्यायालयासमोर आणले आहेत.
तो जामीनावर सुटल्यास फरार होऊ शकतो. तसेच साक्षीदारांवर दबावही आणू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये,’ असा युक्तिवाद यादव यांनी केला होता. आता आरोपीचा युक्तिवादही पूर्ण झाला असून न्यायालयाने निकालासाठी ७ सप्टेंबर ही तारीख ठेवली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम