अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- आज महाराष्ट्रात सर्वत्र सगळे काही सुरू आहे. परंतु ज्यांच्या श्रद्धेवर आज सर्व काही हे सुरू आहे ते मंदिरे आज का बंद ? ज्यांच्या अधिष्ठानावर आपले सर्व जग चालू आहे.
ज्यांच्या श्रद्धेमुळे आपण पुढे जातो, जगतो आणि उंच भरारी घेतो, आपल्या दुःखातून बाहेर पडायचे काम आपण करतो, ज्यांच्यामुळे आपल्याला एक नवी उभारी मिळते, आज त्या मंदिराला या सरकारने कडी कुलपात बांधून ठेवले आहे.
याला कोणते सरकार म्हणायचे, हे सरकार सर्व सर्वसामान्यांचे सरकार म्हणायचे का, ठराविक लोकांचे हितसंबंध पाहणारे सरकार म्हणायचे अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी केली.
शेवगाव येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, समाजात संस्कृती जपण्याचे काम साधुसंतांनी केले आहे, साधुसंत, महंत यांनी समाजात चांगले विचार, श्रद्धा, भावना वाढवण्याचे काम केले आहे.
कोणताच धर्म हा वाईट नाही, सर्व धर्म हे चांगले आहेत. परंतु धर्माचा गैर अर्थ लावणारे मात्र ते वाईट असू शकतात, चांगले अर्थ लावणारे चांगले विचार देणारे चांगले मार्गदर्शक मग ते कोणत्याही समाजाचे असो वा धर्माचे असो त्यांचा आपण आदर केला पाहिजे ही संस्कृती आहे.
आधीच्या काळापासून किंवा शिवाजी महाराजांच्या काळापासुन पाहिले तर अठरापगड जाती-जमातीचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहिलेले नांदलेले आपण पहात आलेलो आहोत.
एकत्रित घरांमध्ये थोड्याफार गोष्टीवरून कुरबुरी तर होतच असतात हे आपल्याला माहीतच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे सर्व समाजाला बरोबर घेऊन आपण चाललो पाहिजेत.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने वित्तहानी, जीवितहानी यासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी शंभो महादेवाने या सरकारला चांगली बुद्धी देऊन या पूरग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोठी मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी यावेळी साकडे घातले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम