अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- गावामध्ये शिवसेना शाखेचा फलक दिसल्यानंतर सर्वसामान्य माणसाला आधार मिळतो, हा अनुभव अनेक वर्षे सर्वांनी घेतला आहे.
त्यामुळेच आता नगर तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेना शाखा व फलक बसविण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रूईछत्तीशी गावाने जिल्हा परिषद, पंचायत समितीला शिवसेनेला नेहमीच साथ दिली आहे
आता बाजार समितीची सत्ताही महाविकास आघाडीच्या ताब्यात देण्याची गरज आहे. असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले. नगर तालुक्यातील रूईछत्तीशी गावात एका कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा.गाडे पुढे म्हणाले की, बाजार समितीतील सत्ताधार्यांनी केलेला मोठा भ्रष्टाचार जगजाहीर आहे.
रिकाम्या जागा, शौचालय, कोंडवाड्याच्या ठिकाणी गाळे बांधून ते विकण्याचा उद्योग चालू आहे. संचालक मंडळ केवळ नामधारी असून सर्व कारभार एकाच व्यक्तीच्या हातात आहे. अशी बोचरी टीका माजी आमदार कर्डीले यांचे नाव न घेता केली. शेतकर्यांच्या हक्काची बाजार समिती वाचण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे.
त्यासाठी नगर तालुक्याने साथ द्यावी. शिवसेना म्हणजे विश्वासाचे नाव आहे. नगर तालुका पंचायत समिती अनेक वर्षांपासून शिवसेना व महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे.
या माध्यमातून दर्जेदार कामे करण्यावर भर दिला जातो. त्यामुळेच इतक्या वर्षात कोणालाही आमच्या कारभारावर बोट ठेवता आलेले नाही. लोकांसाठीची कामे भ्रष्टाचारमुक्त व दर्जेदार व्हावीत हाच शिवसेनेचा प्रयत्न असतो.
या परिसरात स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न ग्रामस्थांनी एकत्रित बसून सोडवावा. नंतर कामासाठी निधी थेट मुंबईहून मंजूर करून आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम