अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- तू आमचे लोकेशन पोलिसांना देतो, आमच्या बातम्या पेपरमध्ये छापतो, आम्हाला तू ओळखत नाही का? असे म्हणत वाळू तस्करांच्या टोळक्याने एका वर्तमान पत्राच्या पत्रकाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दरम्यान ही धक्कादायक घटना श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे मध्ये घडली आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित वर्तमान पत्राचा पत्रकार व्यक्ती घराकडे जात होते. त्यावेळी येळपणे-पिसोरे रस्त्यावरील मारुती मंदिराजवळ एक कार उभी होती. त्या कारमधील सुनील उर्फ प्रेम रामदास जाधव, बबन भाऊसाहेब घावटे यांच्यासह चार ते सहा जणांनी पत्रकारास अडविले.
तू आमचे लोकेशन पोलिसांना देतो, आमच्या बातम्या पेपरमध्ये छापतो, आम्हाला तू ओळखत नाही का? असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी काहींनी दारूच्या बाटल्या त्यांच्या डोक्यावर, पाठीवर फोडल्या. दोघांनी डोक्याला पिस्तूल लावत एक लाख रूपये दे नाही तर तुला सोडणार नाही.
खिशात हात घालत सात हजाराची रोकड काढून घेतली. जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसात तक्रार केली तर तुझ्या कुटुंबाला जिवंत ठेवणार नाही, अशी त्यांनी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम