मोबाईल टॉवर प्रकरणी महापालिका आयुक्त व नगररचनाकार यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- शहरातील धर्माधिकारी मळा येथील फाईव्ह जी मोबाईल टॉवर प्रकरणी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महापालिका आयुक्त व नगररचनाकार यांच्या विरोधात लोकायुक्त न्यायमुर्ती कानडे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

एप्रिलमध्ये टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन धर्माधिकारी मळा परिसरात अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारण्याचे काम सुरु करण्यात आले होते. नागरिकांच्या तक्रारीवरुन सदर काम महापालिकेने काही काळा पुरते बंद केले.

मात्र महापालिकेतील अधिकार्‍यांनी पैसे घेऊन चुकीच्या पध्दतीने टॉवर उभारण्यास अनुमती दिल्याने टॉवरचे काम सुरु झाले असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.

फाईव्ह जी मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे कर्करोग होण्याचा धोका असून, लहान मुलांच्या आरोग्यावर देखील त्याचे गंभीर परिणाम होतात. नागरिकांची झोप उडते तर पशु-पक्ष्यांना देखील याचे दुष्परिणाम होत असल्याने टॉवरला स्थानिक नागरिकांचा विरोध केला आहे.

याप्रकरणी नुकतेच प्रेमदान चौकात रास्तारोको करण्यात आला होता. मात्र महापालिका प्रशासन नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने संघटनेच्या वतीने सदरची तक्रार लोकायुक्तांकडे करण्यात आली आहे.

महापालिक टॉऊन प्लॅनिंगनूसार धर्माधिकारी मळा येथे प्रमिला विजय कानडे यांच्या जागेत फाईव्ह जी मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे. या परिसरात मोबाईल टॉवरच्या पाचशे मीटर अंतरावर दाट लोकवस्ती आहे.

सदर टॉवर उभारण्या अगोदर महापालिकेने नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या नाहीत. लोड बेअरिंगद्वारे बांधण्यात आलेल्या कमकुवत पाया असणार्‍या घरावर सध्या हे टॉवर उभारले जात आहे.

सदर इमारतीला वरच्या मजल्याची परवानगी नसतान अनाधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मजल्यावर हे टॉवर उभे केले जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

अशा अनाधिकृत कामाला महापालिकेचे अधिकारी आर्थिक हित साधून परवानगी देत असल्याने संघटनेचे अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी महाराष्ट्राचे लोकायुक्त न्यायमुर्ती व्ही.एम. कानडे यांच्याकडे आयुक्त व नगररचनाकार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.