कोपरगावाची आसेफा बनली सर्वात कमी वयात वैद्यकीय अधिकारी

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- कोपरगावच्या यशात भर घालणाऱ्या आसेफा पठाण हिने वयाच्या २२ व्या वर्षी एम.बी.बी.एस ही पदवी मिळवून वैद्यकीय अधिकारी झाली. आसेफा ही कोपरगाव तालुक्यात पहिली मुस्लिम समाजातील मुलगी आहे जिने हे घवघवीत यश संपादन करून कोपरगाव तालुक्यातचं नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

कोपरगाव पंचायत समितीच्या विस्ताराधिकारी शबाना शेख व संवत्सर जि.प शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांची ती कन्या आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य विभागात झालेल्या भरती प्रक्रियेत एकुण १७३१ पात्र एम.बी.बी.एस. उमेदवारांमध्ये डॉ.आसेफा राज्यात ३५ व्या क्रमांकाने गुणवत्ता यादीत झळकली त्यामुळे राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट-अ या पदावर तालुक्यातील टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात तिची प्रथम नियुक्ती करण्यात आली आहे.

तिच्या या यशाचे कौतुक व गुणगौरव करण्यासाठी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्था व कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मौलाना आझाद नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री. हशम पटेल,ज्येष्ठ शिवसैनिक मुन्नाभाई मन्सुरी, शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विधानसभा संघटक अस्लमभाई शेख व संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे विश्वस्त विशाल झावरे यांनी भाषणातून आसेफाचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच संवत्सर जि.प.शाळेचे मुख्याध्यापक व डॉ. आसेफा चे वडील फैयाजखान पठाण यांनी डॉ. आसेफाचा १० वी ते एम.बी.बी.एस चा व वैद्यकीय अधिकारी पर्यंतच्या प्रवासाचे अनुभव सांगितले व डॉ. आसेफाने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्यविषयक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी संत ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलच्या वरिष्ठ शिक्षिका वसुधा झावरे व वैशाली लोखंडे यांनी शाळेच्या वतीने डॉ. आसेफाचा यथोचित सत्कार केला. तसेच ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे,शिवसेना शहर संघटक बाळासाहेब साळुंके, व्यापारी सेनेचे वसीम शेख, विभागप्रमुख मंगेश देशमुख,गोविंद चव्हाण, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिंनी डॉ. आसेफाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता भागडे यांनी केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe