अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून २४३६ क्युसेस व विद्यूतगृहाद्वारे ८२० क्युसेस असा एकुण ३२५६ क्युसेस विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे.
धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाश्यांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
भंडारदरा धरणावर आधारीत निळवंडे धरणही ८५ टक्के भरले आहे. त्यामध्ये भंडारदरा धरणातून पाण्याची आवक सुरू झाली असून ते येत्या दोन दिवसात तेही भरणार आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे मोठी पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे निळवंडे धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
धरण भरल्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रीत करण्यासाठी स्पिलवे मधून पाणी सोडण्यात आले. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने रतनवाडी, पांजरे,
घाटघर, भंडारदरा, वाकी, परिसरात सलग दोन दिवस पाऊस असल्याने भंडारदरा जलाशयात वेगाने आवक झाल्याने जलाशय आज सकाळी साडेदहा वाजता पूर्ण क्षमतेने भरले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दरवर्षी १५ ऑगस्ट पूर्वी जलाशय भरते मात्र या वर्षी जलाशय १२ सप्टेंबर रोजी भरले असून जलाशयातून पाणी सोडण्यात येत असल्याने दोन्ही वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू आहेत; तर वाकी जलाशयातून ८९० क्युसेकने कृष्णवंती नदीला पूर आला आहे.
त्यामुळे रंधा धबधबा अवतीर्ण झाला असून निळवंडे जलाशय लवकरच भरेल असा विश्वास जलसंपदा विभागाचे अभिजित देशमुख यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम