अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अकोले तालुक्यातून चार हजार पत्रे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांना पाठविण्यात आले आहेत. या पत्रात दुधाला एमआरपीप्रमाणे दर मिळावा, यासह इतर मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान याबाबतची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लेटर टू डेअरी मिनिस्टर हे अभिनव आंदोलन हाती घेण्यात आले आहे. समितीच्या या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
एकट्या अकोले तालुक्यातून मुख्यमंत्र्यांसह दुग्धविकास मंत्र्यांना चार हजार पत्र पाठवून दुूध उत्पादकांच्या मागण्यांची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दुधाचे खरेदीदार आता काही प्रमाणात सुधारत आहेत.
मात्र असे असले तरी दूध व्यवसायातील अस्थिरता दूध व्यावसायिकांना पुन्हा अडचणीत आणू शकते. दूध व्यवसायातील अस्थिरता लक्षात घेता संघर्ष समितीने आपल्या धोरणात्मक मागण्यांसाठीचा संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार आहे, असेही नवले यांनी म्हटले आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील संगमनेर, नेवासा तालुक्यासह पुणे, नाशिक, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली, औरंगाबाद जिल्ह्यातूनदेखील मंत्र्यांना पत्र पाठविण्यात येऊ लागले आहे. याशिवाय विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांनाही साडेचार पत्र पाठविण्यात आली आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम