अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील बावधन येथील बिग बास्केटच्या गोदामाला रविवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. सुमारे २५ हजार स्क्वेअर फुट असलेले हे पत्र्याचे संपूर्ण गोदाम या आगीमुळे पूर्णपणे नष्ट झाले आहे.
पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण 12 फायर इंजिन्सच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.
याबाबत अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी सांगितले कि, बावधन बुद्रुक येथे नागरिकांना घरपोच भाजीपाला, धान्य, किराणा पोहचविणार्या बिग बास्केट या कंपनीचे सुमारे २५ हजार स्क्वेअर फुटाचे गोदाम आहे. हे गोदाम संपूर्णपणे पत्र्यांचे शेड असून त्याला सुमारे १२ ते १३ शटर होती. रविवारी रात्री साडेअकरा वाजता या गोदामाला आग लागली.
गोदामाला लागूनच मालाची वाहतूक करणारी वाहने व दुचाकी पार्क केल्या होत्या. त्यांनाही या आगीची झळ बसून ती वाहने पेटवून खाक झाली. अग्निशमन दलाला रात्री या आगीची खबर मिळाली.
आग इतकी भीषण होती की, त्यात पत्र्याच्या शेडला लावलेले लोखंडी अँगलही वाकले. त्यामुळे आत जाणे धोकादायक बनले होते. पत्रे अस्तावस्त पडल्याने आगीपर्यंत पाणी पोहचत नव्हते. तेव्हा गावातील २ जेसीबीच्या सहाय्याने पत्रे बाजूला करुन ही आग विझविण्यात आली.
फायरगाड्यांमधील पाणी संपल्याने पाषाण येथून गाड्या पाणी भरून पुन्हा आणण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी आग लागल्याने या ठिकाणी फार लोक नसल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि गोडाऊन जळून खाक झालं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम