राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम ‘या’ दिवशीपासून होणार सुरु

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Liv e24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात 2021-22 साठी ऊसाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

जे कारखाने15 ऑक्टोंबर पुर्वी ऊसाचे गाळप सुरु करतील त्या कारखान्यांच्या संचालकावर गुन्हा नोंदविण्यात येईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत आणि पूर्णत्वाने देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे, यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात असेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

राज्यातील 146 साखर कारखान्यांनी एफएआरपीची 100 टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आल्यानंतर ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.

बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असेही निर्देशही बैठकीत देण्यात आले. या गाळप हंगामात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे 10 टक्के उताऱ्यासाठी 2900 रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे.

2021-22 मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 12.32 लाख हेक्टर असून 97 टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. 1096 लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून 112 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. या हंगामात अंदाजे 193 साखर कारखाने सुरु राहतील असा अंदाज बांधण्यात आला आहे.

राज्यात 112 कारखान्यांद्वारे इथेनॉलची निर्मिती राज्यात सहकारी आणि खासगी मिळून 112 कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प राबविला जातो. या माध्यमातून 206 कोटी लि. इथेनॉलची निर्मिती होते.

केंद्र शासनाने शुगर, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्याचे धोरण स्वीकारल्याने 2022 पर्यंत 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचा लक्षांक पूर्णत्वाला जाईल असेही यावेळी नमुद करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe