अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- देशातील खासदार आणि आमदारांना पेन्शन देणे बंद करावे, ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यासाठी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे सायकलवरून शिर्डी ते दिल्ली प्रवास करणार आहेत.
यासाठी त्यांनी डिसेंबरमध्ये पंतप्रधानांची भेट मागितली आहे. पाच वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर पक्षाने अगर जनतेने नाकारले तरीही संबंधित लोकप्रतिनिधीला आयुष्यभर पेन्शन मिळते. शिवाय कर्मचाऱ्यांकडून जशी पगारातून कपात करून घेतली जाते, तशी कपात लोकप्रतिनिधींकडून केली जात नाही.
त्यामुळे त्यांच्या पेन्शनसाठी नागरिकांच्या कराच्या पैशातून खर्च का करायचा? असा मुद्दा काळे यांनी उपस्थित केला आहे. आरटीआय कार्यकर्ते असलेल्या काळे यांनी या विषयात लक्ष घातले आहे.
यासाठी त्यांनी माहितीचा अधिकार कायद्याचा वापर करून पेन्शनसंबंधी माहिती संकलित केली आहे. त्यानंतर हा प्रश्न मांडण्यासाठी मोदी यांची भेट मागितली आहे.
डिसेंबर महिन्यात शिर्डी ते दिल्ली अशा १३०० किलो मीटरचा प्रवास ते सायकलवरून करणार आहेत. या प्रश्नाकडे देशातील नागरिकांचेही लक्ष वेधले जावे, असा त्यांचा उद्देश आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम