बीजिंग : चीनच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने देशातील सर्वच मोबाईल कंपन्यांना नवा मोबाईलक्रमांक देण्यासाठी मोबाईल ग्राहकांचा चेहरा स्कॅन करवून घेणे अनिवार्य करण्याचे निर्देश दिलेत. याद्वारे चीनचा देशातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा मानस असल्याचे सांगण्यात येत असले तरी नागरिकांवर पाळत ठेवण्याचा यामागे हेतू असल्याचा आरोप होत आहे.
चीनकडून जनगणनेसाठी फेशियल रिकॉग्नेशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. चीन सरकारने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षापर्यंत देशात १७ कोटी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
२०२०पर्यंत देशभरात ४० कोटी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. याशिवाय चीन सोशल क्रेडिट सिस्टीम तयार करत आहे. ज्याद्वारे सर्व नागरिकांची सार्वजनिक वर्तणूक, चर्चा यांचा डेटाबेस तयार करण्यात येईल.
गत सप्टेंबर महिन्यात चीनच्या उद्योग व माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने एक नोटीस जारी करून नागरिकांच्या ऑनलाइन कायदेशीर अधिकार व हितांचे संरक्षण करण्याचे सूतोवाच केले होते.
त्यानुसार, मंत्रालयाने नव्या मोबाईल ग्राहकांना नंबर जारी करताना कृत्रिम बुद्धिमत्ता व अन्य तंत्रज्ञानाद्वारे नागरिकांची ओळख पटविण्याचे बंधनकारक केले आहे. या नियमाची चालू आठवड्यापासून अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.