‘सॅमसंग’ कडूनही मोबाईल रिटेलर्सची पिळवणूक, नवीन मॉडेलची थेट ऑनलाईन विक्री

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  देशातील आघाडीच्या मोबाईल कंपन्यांच्या व्यापार धोरणामुळे देशभरातील मोबाईल रिटेलर्स त्रस्त झाले आहेत. सॅमसंग कंपनीने मोबाईलचे फोल्ड 3 व फ्लिप 3 हे नवीन मॉडेल बाजारात आणले.

त्यासाठी रिटेलर्सना प्री बुकींग करायलाही लावली. रिटेलर्सनी आपले व्यावसायिक कौशल्य पणाला लावून असंख्य ग्राहकांचे बुकींग मिळवले.

मात्र आता सदर मोबाईल रिटेलर्सना न देता थेट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बुकींग केलेले ग्राहक रिटेलर्सना धारेवर धरत आहेत.

याशिवाय कंपनी रिटेलर्सकडे बुकींग केलेल्या ग्राहकांना थेट फोन करून ऑनलाईनव्दारे मोबाईल घेण्यास प्रवृत्त करीत आहे. ही रिटेलर्सची पिळवणूक असून कंपनीने अशी फसवणूक करणे थांबवावे अशी मागणी ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय संयुक्त सचिव नवनीतजी पाठक यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी सॅमसंग इंडियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पत्र पाठविले आहे. याविषयी अधिक माहिती नवनीतजी पाठक यांनी सांगितले की, सॅमसंगने फोल्ड 3 व फ्लिप 3 मॉडेलची घोषणा केल्यानंतर प्री बुकींग घेण्यास सुरुवात केली. रिटेलर्सना गणेशोत्सवात बुकींगनुसार माल पोहोच करण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार देशभरातील हजारो मोबाईल रिटेलर्सनी ग्राहकांकडून बुकींग घेतले. परंतु, माल देण्याची वेळ आल्यावर कंपनीने हात वर केले. उत्पादन कमी असल्याचे सांगण्यात आले.

प्रत्यक्षात फ्लिपकार्ट व सॅमसंगच्या स्वत:च्या वेबसाईटवर एका दिवसांत या नवीन मॉडेलची डिलिव्हरी होईल अशी विक्री व्यवस्था केली. एवढेच नव्हे तर रिटेलर्सनी बुकींग केलेल्या ग्राहकांची माहिती मिळाल्यानंतर थेट संबंधित ग्राहकांना फोन करून ऑनलाईन पध्दतीने मोबाईल घेण्याचा सल्ला देण्यात आला.

या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहकही चक्रावले आहेत. अनेक जण रिटेलर्सकडे धाव घेवून जाब विचारत आहेत. बुकींग करूनही मोबाईल देत नसल्याने काहींनी तर थेट रिटेलर्सलाच ग्राहक न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.

सॅमसंगच्या या अनुचित व्यापार धोरणामुळे रिटेलर्ससमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनीने तातडीने नवीन मॉडेलची ऑनलाईन विक्री थांबवून रिटेलर्सना बुकींगप्रमाणे संपूर्ण माल उपलब्ध करून द्यावा,

अशी मागणी करण्यात आली आहे. मोबाईल कंपन्यांचा मनमानी कारभार रिटेलर्ससाठी धोकादायक ठरत असून कंपनीने आपले धोरण तातडीने बदलण्याची गरज व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News