अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या पवित्र गोदावरी नदीचे धार्मिक आणि पौराणिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्यादृष्टीने कोपरगाव पालिकेने नदी स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गोदामाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ ढाकणे यांनी निवेदनातून केली आहे.

याबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून वाहणार्‍या गोदावरी नदीचे धार्मिक व पौराणिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे.

त्यामुळे नदी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. रक्षा विसर्जनाकरिता कुंड तयार करणे, संत जनार्दन स्वामी मौनगिरी सेतू लहान पुलाच्या दोन्ही बाजूस जाळी बसविणे,

महिलांना नदीत स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था करणे, श्री स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूचा रस्ता बंद करणे,

शहरातून वाहून जाणार्‍या गटारीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारणे, गणेश विसर्जनावेळी उपाययोजना करणे आदी सूचना केल्या आहेत. याबाबत पालिका काय कार्यवाही करते याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.