आत्मविश्‍वासाच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया उपविजेत्याचा खडतर प्रवास झाला शक्य -मान्या सिंह

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- आत्मविश्‍वासाच्या जोरावर रिक्षा चालकाची मुलगी ते मिस इंडिया उपविजेत्याचा खडतर प्रवास शक्य झाला. जीवनात काही करुन दाखविण्याची हिंमत व कष्ट करण्याची तयारी असेल तर आजच्या मुलींना व युवकांना सर्वकाही शक्य आहे. युवक-युवतींनी मोठी स्वप्न पहा व ती साकार करण्यासाठी स्वत:ला त्या दिशेने झोकून द्यावे.

प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष आहे. या संघर्षातून मार्ग काढून पुढे गेल्यास तो यशस्वी होत असल्याचा कानमंत्र मिस इंडिया 2020 मध्ये उपविजेता ठरलेल्या मान्या सिंह (मिस इंडिया रनर्स अप) यांनी दिला. मोरया युवा प्रतिष्ठाण मंडळाच्या गणेश विसर्जनाकरिता शहरात आलेल्या सिंह यांनी हॉटेल औरस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी खडतर जीवन प्रवासाचा उलगडा केला.

यावेळी मोरया युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अर्जुन मदान, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, पंजाबी समाजाचे अध्यक्ष प्रदिप पंजाबी, आकाश चड्डा, मनोज मदान, अपर्णा मदान, राधाकृष्ण मंदिरचे अध्यक्ष राकेश गुप्ता उपस्थित होते. पुढे बोलताना मान्या सिंह यांनी वयाच्या वीस वर्षात सर्वसामान्य मुलगी म्हणून मिस इंडिया रनर्सचा किताब पटकाविताना आनंद होत आहे.

मिस इंडिया 2020 उपविजेता झाल्यानंतर उत्तरप्रदेश मध्ये मायभूमीत परतताना एक वेगळा अनुभव होता. चौका-चौकात नागरिकांनी स्वागत केले. नागरिकांनी या प्रवासासाठी प्रेरणा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमध्ये मुलींना मोठी स्वप्न न पाहण्याचा संकुचित विचाराला छेद देऊन वयाच्या चौदाव्या वर्षी घराबाहेर पडून आपले ध्येय गाठले.

भविष्यात फिल्म व फॅशन इंडस्ट्रीजमध्ये काम सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजकारणावर त्यांच्याशी भाष्य केले असता, त्यांनी युवकांची राजकारणात खरी गरज असल्याचे सांगितले. युवकांमध्ये नवीन कल्पनाशक्ती व काही करुन दाखविण्याचा जोश असल्याने ते बदल घडवू शकणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

तर स्वत: देखील उत्तर प्रदेशमध्ये भविष्यात राजकारणात जाऊ शकत असल्याचे सुतोवाच केले. तसेच स्वयंपाक व कविता लिहिण्याचा छंद असल्याचे त्यांनी सांगितले. अर्जुन मदान यांनी मोरया युवा प्रतिष्ठाणच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य सुरु आहे.

आजच्या युवक-युवतींपुढे एक चांगला आदर्श उभा करण्यासाठी मान्या सिंह यांना शहरात पाचरण करण्यात आले. टाळेबंदीनंतर युवकांच्या आत्मविश्‍वास डळमळीत होत असताना, याच परिस्थितीमध्ये आपल्या संघर्षमय जीवनात एका रिक्षा चालकाच्या मुलीने मिस इंडिया रनर्सचा किताब पटकाविणे गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात हरजितसिंह वधवा यांनी युवक-युवतींना मान्या सिंह यांचा खडतर जीवनप्रवास एक दिशादर्शक ठरणार असून, या भावनेने मोरया युवा प्रतिष्ठाणने हा कौतुकास्पद उपक्रम राबविल्याचे सांगितले. अपर्णा मदान यांनी लहान शहरातील मुली मोठे स्वप्न पाहू शकतात, हा आत्मविश्‍वास मान्या सिंह यांनी सर्व युवतींना दिला.

ती स्पर्धा जिंकली नसली तरी, देशभर तिच्या नावाची चर्चा होती. मॉडलिंग क्षेत्रात करिअर करत असताना घर सोडून एका युवतीने अतीशय खडतर प्रवास करुन तिने आपल्या ध्येया पर्यंत जाण्याची हिंमत दाखवली आहे.

आर्थिक परिस्थिती बिकट असताना किशोर वयात नोकरी केली. तिचा हा खडतर प्रवास आजच्या युवतींसाठी मार्गदर्शक असल्याचे सांगितले. आभार राकेश गुप्ता यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe