अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असे राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.
राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमके काय माहित असते, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यावेळी उपस्थित होते. उपाध्ये म्हणाले की, किरीट सोमैय्या हे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले.
सोमैय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याच्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हती असा खुलासा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना सोमैय्या यांना रोखण्यात आल्याच्या घटनेची कल्पना नव्हती असे स्पष्ट केले आहे.
एवढ्या महत्वाच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती तर मुख्यमंत्र्यांना नेमके काय माहिती असते असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. या घटनांचीही मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई कोकणवासीयांना मिळाली की नाही याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती.
तत्परता सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबतही दाखवा असे असेल तर राज्याचे सरकार चालविते तरी कोण असा प्रश्न उपाध्ये यांनी केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम