अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ज्या पारनेर तालुक्यातून आंदोलनांची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत.
पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी कारखाना बचाव समितीने सक्तवसुली संचालनालयाकडे केली आहे.
समितीच्या प्रतिनिधींनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड व ईडीचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेतली होती. त्यानंतरच हालचालींना वेग आला.
क्रांती शुगरकडे पैसे नसतानाही ३२ कोटींना हा कारखाना कसा विकत घेतला असा प्रश्न उपस्थित करत सहकारी बँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया संशयास्पदरित्या राबवली असल्याचा आक्षेप बचाव समितीचा आहे.
या कारखाना विक्रीतील भ्रष्टाचाराबाबत खंडपीठातही तीन याचिका दाखल आहेत. सोमय्या कारखाना स्थळावर सभासद व शेतकऱ्यांशी संवाद साधतील. नंतर ते पारनेर येथे येतील.
पुरावे देऊन ईडीकडे पाठपुरावाही केला होता. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे ईडीविरोधात मुंबई येथे २० ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा बचाव समितीने दिला आहे.
पालमंत्री मुश्रीफ यांच्याशी संबंधित कारखान्यांची पाहणीसाठी जाणाऱ्या सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी केली होती. त्यावरून हाय होल्टेज ड्रामा रंगला होता. आता नगर जिल्ह्यातही सोमय्या यांना प्रवेश बंदी होईल का? याची उत्सुकता आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम