अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- राज्यातील मंदिर उघडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला घटस्थापनेचा मुहूर्त सापडला असला तरी, केवळ भाजपच्या मागणीला विरोध म्हणून इतके दिवस मुख्यमंत्र्यांनी हा विषय व्यक्तिगत प्रतिष्ठेचा केला होता का?
असा सवाल भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या संदर्भात झालेल्या गोंधळावर भाष्य करताना आ.विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ रोजच सुरु आहे.
त्याचे परिणाम विद्यार्थ्यांना भोगावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परिक्षेत नापास झाले आहे. सरकारच्या अनिश्चिततेचा परिणाम जनतेला भोगावा लागत असल्याची टिकाही आ.विखे पाटील यांनी यावेळी केली.
माध्यमांशी बोलताना आ.विखे पाटील म्हणाले की, इतर राज्यांमध्ये नियमावली करुन मंदिर केव्हाच उघडण्यात आली. तिरुपती देवस्थान, वैष्णोदेवी यांसारखी मोठी देवस्थानही कोव्हीड नियमांचे पालन करुन भाविकांसाठी उघडण्यात आली.
आपल्या राज्यात मात्र मंदिर उघडण्यास महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक उशिर केला. केवळ भाजपाची मागणी होती म्हणून हा प्रश्न सरकारने व्यक्तिगत केला अशी टिका त्यांनी केली.
राज्यातील एकीकडे मॉल सुरु झाले, बियरबार सुरु होते, एस.टी बसेसही सुरु झाल्या मग फक्त भाविक मंदिरात गेल्यानेच कोरोना होणार होता का? हा नकारात्मक दृष्टीकोन घेवून मुख्यमंत्री काम करणार असतील तर राज्याचा विकास कारण्याच्या केवळ गप्पा ठरल्या आहेत, जनतेचा त्यांच्यावर भरवसा राहिलेला नसल्याचे आ.विखे पाटील म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम