अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. यातून गुलाब चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.(Ahmednagar rain update)
नगर जिल्हयात सोमवार (दि.27) ते बुधवार (दि.29) या कालावधीत विजेचा कडकडाट व वादळी वार्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागामार्फत वर्तविण्यात आलेली असून जिल्हयासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे,
त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप निचित यांनी दिली आहे. जिल्हयातील पर्जन्यमानामुळे वा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यास धरणाच्या पाणीसाठयात वाढ होऊन पर्यायाने नदीपात्रातील विसर्गात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जिल्हयातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी या गोष्टींची काळजी घ्यावी सखल भागात राहणार्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावेत. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे.
पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्र तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. जुनाट, मोडकळीस आलेल्या व धोकादायक इमारतीमध्ये आश्रय घेऊ नये.
धोकादायक झालेले तलावांचे क्षेत्रामध्ये राहणार्या नागरिकांचे तातडीने सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहण्यार्या लोकांनी दक्षता घ्यावी वेळीच सुरक्षीत स्थळी स्थलांतर करावे. तसेच जिल्हयातील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम