अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.
कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहोचवावी असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी आज सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशीदेखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळीदेखील मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या.
गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत
नुकसानीचे पंचनामे सुरू करा
सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत असेही निर्देश त्यांनी दिले.
सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका
निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे आणि अनेक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचू शकले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,
म्हणून या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षा देण्याची पुन्हा संधी देण्यात येणार आहे, याविषयी विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचवा तसेच नवीन तारखांबाबत माहिती द्या असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे.
हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले
यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर , औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टरने तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतलां आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांचा घेतला आढावा
उस्मानाबाद – जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, कळंब तालुके प्रभावित झाले असून एकूण दहा महसुली मंडळे प्रभावित झाली आहेत. यापूर्वीही तीन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून काल अतिवृष्टी झाल्याने शिराढोण 171 मिमी, गोविंदपुर 107 मिमी, ढोकी जाकची आणि तेर येथे जवळपास 140 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यामध्ये दोन मोठ्या नद्या असून मांजरा नदीवरील मांजरा धरणाचे सर्व दरवाजे उघडले असून धरणातून साधारणतः 706 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या खालील वाकी व वाक्केवाडी गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व गावातील नागरिक अडकले होते.
सदर नागरिकांना स्थानिक बचाव पथकांच्या माध्यमातून बोटीच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील दाऊतपुर गावातील सहा व्यक्ती तेरणा नदीच्या पाण्यामुळे वेढले गेल्याने ते उंच भागात टेकडीवर आसरा घेऊन थांबले आहेत.
यांच्या बचावासाठी भारतीय हवाई हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्यातील पूरपरिस्थितीदरम्यान मदत व बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम तैनात करण्यात आली आहे.
तालुका सौंदनाआंबा गाव कळंब येथे दहा जणांना व उस्मानाबाद गाव दाऊतपुर येथे सहा जणांना हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
लातूर- पोहरेगाव तालुका रेनापुर येथे अडकलेल्या तीन व्यक्तींच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पूरपरिस्थिती दरम्यान मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफची एक टीम देखील तैनात करण्यात आली आहे
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील निर्माण पूरपरिस्थितीमध्ये स्थानिक बचाव पथकाने आतापर्यंत 24 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले असून अतिरिक्त मदतीसाठी एनडीआरएफचे एक पथक रवाना केले आहे.
यवतमाळ- उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरून पाणी असताना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने पुलावरून नेली असता गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. बसमध्ये चार ते सहा प्रवासी असल्याची माहिती प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.
स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून एक व्यक्ती झाडावर चढला होता व एक व्यक्ती एसटीच्या टपावर चढला होता त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह प्राप्त झाले आहेत.
जळगाव- गेल्या काही दिवसात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व धरणे शंभर टक्के क्षमतेने भरलेली आहेत. चाळीसगाव येथे यापूर्वी ढगफुटी झाली होती. त्याठिकाणी अतिवृष्टीमुळे चाळीसगाव मध्ये पाणी साचलेले आहे.
सध्या रेड-अलर्ट असल्याने सर्व तालुक्यात स्थानिक बचाव दल तैनात करण्यात आले असून, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम अंमळनेर येथे तैनात करण्यात येणार आहे.
बुलढाणा- जिल्ह्यातील तीन तालुक्यात रात्री साडेदहा ते सकाळी पाच पर्यंत अतिवृष्टी झाली असून या तालुक्यातील सर्व मंडळी महसुली मंडळात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तथापि परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. बचावकार्यासाठी स्थानिक दल तैनात आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम