‘त्या’ उद्योजकाचा मृत्यू ! १५ जणांवर संशय… हाती महत्वाचे धागेदोरे लागले

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. शिरूरचा असलेला बांधकाम व्यवसायीक आदीत्य चोपडा हा बेपत्ता झाल्यानंतर त्याचा पारनेर तालुक्यातील नवलेवाडी शिवारात मृतदेह आढळून आला .

त्याच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तब्बल १५ जणांची कसून चौकशी सुरू केली असून स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती महत्वपूर्ण धागेदारे मिळाल्याची माहीती आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि सोमवार दि. २७ रोजी आदीत्य चोपडा शिरूर जि. पुणे येथून नवलेवाडी येथे जातो असे सांगून आय २० कार घेऊन (एम एच १२ आर एल ८१) सकाळी नऊ वाजता गेला होता. आदीत्य पारनेर तालुक्यातील कडूस तसेच नारायणगव्हाण येथे बांधकामाची कामे करीत होता.

नारायणगव्हाण येथे शासकिय रस्त्याचे काम त्याने नुकतेच पुर्ण केले होते. त्या कामावर फलक लावण्यासाठी तसेच कडूस येथील बंगल्यांच्या कामाची देखरेख करून येतो असे त्याने घरी सांगितले होते.

दुपारच्या सुमारास वडील संदीप चोपडा यांच्याशीही आदीत्यची चर्चा झाली होती. सायंकाळनंतर आदीत्य याचा संपर्क तुटल्यानंतर त्याच्या घरच्या लोकांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

नवलेवाडी येथे त्याची कार बेवारस अवस्थेत आढळून आली. नातलगांनी ती ताब्यात घेउन सुपे पोलिसांना आदीत्य बेपत्ता झाल्याची खबर देण्यात आली. आदीत्य बेपत्ता झाल्याने सुपे पोलिसांनी शोध सुरू केला, परंतू त्यांच्या हाती काही धागे दोरे लागले नाहीत.

बुधवारी सकाळी नवलेवाडी मळयातील विहीरीत आदीत्यचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयास्पद १५ जणांची कसून चौकशी सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले असून त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला आहे.

संशयास्पदांपर्यंत पोहचेपर्यंत या प्रकरणी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून आदीत्यचा घातपात झाल्याचाही संशय घेण्यात येत आहे. आदीत्यची कोणा व्यवसायीकाची स्पर्धा होती का ? व्यवसायातून त्याचे कोणाशी वाद होते का ? याचीही खातरजमा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe