अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- नगरच्या आडतेबाजार येथील एका वृद्ध व्यापाऱ्याच्या पोटाला चाकू लावून त्यांच्याकडून ७० हजार रुपये लुटल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला.
याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित व्यापाऱ्याने रीतसर तक्रार देखील केली.पोलिसांनी पकडून आणलेल्या आरोपीकडून वसुली तर केलीच नाही पण त्याला तो जीवाचे काही बरे वाईट करून घेईल या भीतीने चक्क सोडून दिले.
नगरच्या आडते बाजारातील नारळाचे व्यापारी सुंदरलाल गांधी यांच्या आनंद कोकोनट या पेढीवर ते दुपारच्या वेळी बसलेले असताना ही घटना घडली.
त्यांना बाबल्या (पूर्ण नाव माहित नाही) याने त्यांच्या दुकानात शिरून त्यांना चाकूचा धाक दाखवला आणि गल्ल्यातून ७० हजार रुपये काढून घेतले .
हा प्रकार घडल्यानंतर त्याने तेथून पोबारा केला. तो दुकानात येऊन व्यापाऱ्यांना धाक दाखवत असल्याचे व्हिडीओ आसपासच्या लोकांनी काढले व ते पोलिसांना दिले.
या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला पकडून देखील आणले पण तो पोलीस ठाण्यातच भिंतीवर लावलेल्या आरशाला धडका घेतल्याचे नाटक करू लागल्याने पोलिसांनी त्याला लगेचच सोडून दिले.
त्याच्याकडून कोणच्याही पैशांची वसुली करण्यात आली नाही . त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा आरोपी हे व्यापारी पोलीस स्टेशनला गेल्याचे पाहून त्याने त्यांच्या दुकानाचे कुलूप दगड घालून फोडण्याचा प्रयत्न केला.
हा इसम दररोज बाजारपेठेत फिरतो आणि व्यापाऱ्यांना १०० ते १००० रुपयांची मागणी करतो पैसे न दिल्यास तो व्यापाऱ्यांना धमकवतो. काही व्यापारी भीती पोटी पैसे देतात. त्यामुळे तो सोकावला आहे. तोफखाना पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम