अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- अतिवृष्टी झालेल्या परिसरातील शेतकरी-नागरिकांना तातडीची मदत आणि कोकण धर्तीवर अनुदान मिळावे. महाराष्ट्र शासन मदत वाटपात काही जिल्ह्यांना एक आणि नगर जिल्ह्यास एक न्याय देते आहे.
नुकसानग्रस्तांना मदत करताना वेगळा न्याय का ? असा संतप्त सवाल आमदार मोनिका राजळे यांनी उपस्थित केला. त्यामुळे पाथर्डी,शेवगांव, नगर तालुक्यातील बाधितांवर अन्याय होत आहे. जिल्ह्यातील शेतकरी- नागरिकांना शासनाने तात्काळ मदत देऊन ११ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयाप्रमाणे वाढीव मदत करावी.
अशी मागणी त्यांनी केली. तर यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले म्हणाले, अतिवृष्टीच्या नुकसानीची मदत मिळावी म्हणून यापूर्वीच निवेदन दिले. आता पुन्हा निवेदनाद्वारे लक्ष वेधीत आहोत. मंत्री फिरत नाहीत आणि सरकारचे लक्ष नाही.
निवेदनाची दखल घेत मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आठ दिवसात जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर भाजपाचे नेते, पदाधिकारी उपोषणास बसतील, असा इशारा कर्डीले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
अतिवृष्टी झालेल्या परिसरातील नुकसानग्रस्तांना तातडीची रोख स्वरूपात मदत मिळावी, जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती व्हावी आणि वीज वितरण कंपनीकडून सुरु असलेली वीज बीलाची सक्तीची वसुली तातडीने थांबवावी,
या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले निवेदन देण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम