दिवाळीपूर्व जामखेड शहर उजळून निघणार… कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- जामखेड नगरपरिषदेच्या वतीने शासनाच्या ऊर्जा संवर्धन धोरणातंर्गत शहरातील जुने पारंपरिक दिवे बदलून त्याजागी २ हजार ३७० एलईडी पथदिवे बसवले जाणार आहे.

यामुळे नगरपरिषदेच्या लाखो रुपयांची विजेच्या बिलाची बचत होणार असून दिवाळीपूर्व शहर उजळून निघणार आहे. दरम्यान पहिल्या टप्प्यात १ हजार २०० पथदिवे लावले जाणार आहे.

जामखेड शहरातील सर्व भागात जुने पारंपरिक जास्त ऊर्जाखाऊ पथदिवे बसविण्यात आले होते. शहरात असलेले जुने पथदिवे सतत बंद राहत असल्याने नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) माध्यमातून ईस्को तत्त्वावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी या कंपनीशी करारही केला आहे.

त्याअंतर्गत आता जामखेड शहरात २ हजार ३७० एलईडी पथदिवे बसविले जाणार असून पहिल्या टप्प्यात १ हजार २०० एलईडी पथदिवे बसवले जाणार आहेत.

कंपनीकडून शहरातील पथदिव्यांचा सर्व्हे करून जुने पथदिवे बदलून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक ऊर्जा बचतीचे एलईडी पथदिवे बसविले जाणार आहेत.

नवीन एलईडी पथदिवे बसविणे व अनुषंगिक कामाचा सर्व भांडवली खर्च कंपनी करणार आहे. ही कंपनी देखभाल दुरुस्तीही करणार आहे.येत्या दोन महिन्यात दिवाळीपूर्व शहरात एलईडी दिवे लावण्याचे उद्दिष्ट आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe